वाघूर धरणातील पाणीसाठ्याचे जलपूजन सोहळा संपन्न…!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (महानगर प्रतिनिधि)। जळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवीणाऱ्या वाघुर धरणातील पाणीसाठ्याचे जलपूजन व पूजा अर्चा करण्यात आली. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे शहरापासुन २२ किलोमीटर अंतरावरील वाघूर धरण यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी ९० टक्के भरले.
त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक व कृतज्ञता म्हणून गुरुवार, दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी धरणा स्थळी जळगावच्या प्रथम नागरिक महापौर सौ. जयश्रीताई सुनिल महाजन व उपमहापौर श्री. कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितित जळगावचे रहिवाशी श्री. युवराज तांबे व सौ. तांबे यांनी जलपूजा-अर्चा केली. या प्रसंगी महापौर सौ. महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जळगावकरांना २ दिवसाआड़ मिळणारे पाणी १ दिवसाआड मिळावे व शहरवासी पाण्यापासुन वंचित राहु नये तसेच नद्या ह्या हिंदु संस्कृतीनुसार आपल्या माता आहेत व जेव्हा नद्यांचा ओघ ओसांडून येतो, तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी व पाण्याची पवित्रता व शुद्धता कायम ठेवण्यासाठी जल पूजन केले जाते असे मत त्यांनी व्यक्त केले.
जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांनी यावेळी वाघुर धरणाचा मागिल तीन वर्षांचा आलेख सांगितला. त्यानुसार २२ सप्टेंबर २०१९ रोजी वाघुर धरण १००% भरले होते. २९ ऑगस्ट २०२० रोजी ९९.६०% तर ह्या वर्षी ७ सप्टेंबर २०२१ रोजी ९०% भरल्याचे सांगितले , व लवकरच १००% पूर्ण भरावे अशी प्रार्थना व धरणा प्रति ईश्वराकडे कृतज्ञता व धन्यता व्यक्त केली.