‘तू फक्त माझी आहेस, माझी नाही झाली तर तुला जीवंत सोडणार नाही’, एकतर्फी प्रेमातून धमकी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन ‘तू फक्त माझी आहेस, तू जर माझी नाही झाली नाहीस तर मी तुला जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी एकतर्फी प्रेमातून युवकाने दिली. तसेच तिचा विनयभंगही केला. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कुलदीप रवींद्र सपकाळे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे त्या युवकाचे नाव असून गुरुवारी दुपारी अग्रवाल चौफुलीच्या पुढील बाजूस असलेल्या रुबी हॉस्पिटल समोरुन ती मुलगी मैत्रीणीसोबत पायी जात होती. त्यावेळी कुलदीप याने तिचा पाठलाग केला. यावेळी आरोपीनं ‘तू फक्त माझी आहेस, तू जर माझी नाही झाली नाहीस तर मी तुला जीवंत सोडणार नाही’’ अशा शब्दांत आरोपीनं पीडित मुलीला धमकी दिली आहे. यावेळी आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. तसेच दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.