जळगाव एसटी कर्मचारी संपावर ठाम,परिवहन मंत्र्यांचा शेवटचा इशारा,प्रवाशांची गैरसोय मात्र कायमच
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज सेवा। महाराष्ट्रात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. राज्य सरकारकडून काही मागण्या मान्य केल्या आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे राज्य परिवहन खात्याने कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी देखील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्यास पसंती दर्शविली नाही. आझाद मैदानात महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले आहे. संपाच्या काळात अनेक कामगारांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. अनेक महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी कामावर हजर राहिले नसल्याने अनिल परब यांनी शेवटचा इशारा दिला होता. त्यावेळी जळगाव आगारात 186 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र अद्याप अडीच हजाराहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले नसून संपावर ठाम आहेत. त्यामुळे जळगाव एसटी प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहे.
2591 कर्मचारी अद्यापही आपल्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम जळगाव विभागातील 229 एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 19 कर्मचाऱ्यांनी जळगाव विभागाच्या नियंत्रण त्यांच्याकडे कामावर रुजू करून घेणे संदर्भात अपील केले आहे. त्यातच 151 कर्मचारी निलंबित आहे. ही संख्या 160 वर पोहोचली असून जळगाव विभागातील 2591 कर्मचारी अद्यापही आपल्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेऊन आंदोलनात सहभागी आहेत. तर दुसरीकडे 2191 कर्मचारी अजूनही गैरहजर असल्याने प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन
राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विलीनीकरण करावं यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगारवाढ अशा चार प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. त्यापैकी काही मागण्या राज्य परिवहन विभागाने मान्य केल्या आहेत. परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना सगळ्याचं मागण्या हव्या असल्याने त्यावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अयशस्वी ठरलं आहे. महाराष्ट्रात अडीचशे एसटी आगार आहेत. त्यापैकी अनेकांनी संपात सहभाग घेतला होता. त्यापैकी सरकार कारवाई करीत असल्याने पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. तर अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.