मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा गोद्री दौरा अखेर रद्द
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकथान शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. परंतु आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड शासकीय विमानातून जळगावच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु तांत्रिक बिघाड झाला. यानंतर तिघेही मुंबई विमानतळावर प्रतीक्षा करत होते. जळगावातील कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मुंबई ते जळगाव हे अंतर फार असल्यामुळे ते रस्ते मार्गाने गेले तरी कार्यक्रमाला पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु अर्धा तासानंतरही बिघाड दुरुस्त न झाल्याने त्यांनी जळगाव दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेने तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर या निवासस्थानी रवाना झाले आहेत.
बंजारा समाजाच्या वतीने जळगावात महाकुंभ देशभरातील संतांच्या मार्गदर्शनामध्ये बंजारा समाज बांधवांची एकजूट व्हावी, व्यसनापासून तरुणांनी दूर राहावं तसंच बंजारा समाजाचे धर्मांतर रोखण्यासाठी अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जामनेर तालुक्यातील गोदरी येथे महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या महाकुंभाचा समारोप होणार आहे. या महाकुंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु रामदेव बाबा उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड देखील उपस्थित राहणार होते. परंतु आता जळगाव दौरा रद्द केल्याने ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजर राहतील.