पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील व्यावसायिकाच्या घरी साडे १७ लाखांचा दरोडा !
जामनेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील पहूर येथील पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणार्या व्यावसायिकाच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी व्यापार्याच्या घरावर दरोडा टाकून साडे १७ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून पोलीस स्थानकाच्या जवळच चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पहूर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर राहिवासास असलेले भुसार माल व्यावसायिक अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटूंबियांसोबत २५ ऑगस्ट पासून राजस्थान येथे फिरायला गेले असल्याने त्याचे घराला कुलूप लावून बंदच होते हे बघून घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरा बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घराची झाडाझडती घेऊन कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत अज्ञात चोरट्यांनी घरातील 47 तोळे सोने, ५०० ग्राम चांदी तसेच २ लाख ९० हजार रुपयांची रोकड सोन्या-चांदीचे दागिनेसह असा एकूण साडे १७ लाखांचा ऐवज लंपास करत चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती समोर गोडाउन मध्ये काम करणार्या हमालांनी फिरवायला गेलेल्या अनिल कोटेचा यांना दिली असता त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी लागलीच पहूर पोलिस स्टेशनला कळवले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचार्यांनी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी जळगाव येथील श्वान पथकासह, ठसे तज्ञांनी पाहणी करत अनिल कोटेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत.