शाळकरी मुलांना ट्रॅव्हलने चिरडले,तीन वर्षीय मुलगा जागीच ठार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जामनेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना जोरदार धडक दिल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचा पाच वर्षीय भाऊ जखमी झाला आहे. यावेळी संतप्त जमावाने ट्रॅव्हल बसची तोडफोड केली.
धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन बालाजी ट्रॅव्हल्स (एम एच २१ बीएच ०६४७) ही शनिवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निघाली होती. बस देऊळगाव बस स्थानकाजवळ आली असताना दोन सख्खे लहान भाऊ रेहान नशीब तडवी (वय ५ वर्ष) आणि आर्यन नसीब तडवी (वय ३ वर्ष) यांना जबर धडक दिली.
जखमी बालकांना आजूबाजूच्या नागरिकांनी बुलढाणा येथे उपचारार्थ हलविले. त्यामध्ये ३ वर्षीय आर्यन याचा मृत्यू झाला तर ५ वर्षीय रेहान गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड संताप करत त्यांनी ट्रॅव्हल्सची तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दुर्घटनेतील ट्रॅव्हल्सचे वाहन चालक आणि वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.