“…त्यामुळे राज ठाकरे केवळ शरद पवारांवर बोलतात”, जयंत पाटलांचे मोठे विधान
सांगली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जयंत पाटील म्हणाले की, ‘आपण भाजपवर का बोलत नाही याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकत नाहीत. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणता तरी दबाव असल्याने आणि त्यांनी फक्त शरद पवारांच्यावर बोलायचे, बाकी काही बोलायचं नाही असे सांगितले गेल्याने राज ठाकरे केवळ शरद पवार यांच्यावर बोलतात’, असे पाटील म्हणाले.
‘राज ठाकरे यांनी महागाईवर पण बोलावे. पण ते बोलत नसल्याने त्यांच्याभाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली आहे असे दिसते.’ तसेच शरद पवारांचा द्वेष करा, त्यांच्याविरोधात बोला, अशी स्क्रिप्ट राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे. ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव त्यांच्यावर असून त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत, असेही पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले,‘राज ठाकरे यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही. भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते. मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे.’ तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय, अशी घणाघाती टीकाही पाटलांनी केली.