इगतपुरी- कसारा दरम्यान धावत्या रेल्वेत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कल्याण,वृत्तसंस्था। लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी स्थानकातून ट्रेन निघाली आणि बोगद्याजवळ ट्रेन स्लो होते. यावेळी सात-आठ जण ट्रेनमध्ये चढले. या चोरट्यांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले त्यांच्याकडून पैसे आणि मोबाइल हिसकावून घेतले. त्यांना बेदम मारहाण केली. अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत.
प्रवाशांना लुटल्यानंतर या दरम्यान एका महिलेचीही चोरट्यांनी छेड काढली. दरोडेखोरांची नजर रेल्वेतून प्रवास करणार्या 20 वर्षीय तरुणीसोबत जबरदस्ती करत धावत्या रेल्वेमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या संतापजन घटनेनंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित प्रकार इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान घडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कल्याण जीआरपीने दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी चार संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून, चार जण फरार आहेत.चौघा आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर, रेल्वेतून प्रवास करणार्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून रेल्वेमध्ये अत्याचाराची घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.