के-हाळा येथील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार…….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
के-हाळा,ता.रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील के-हाळा बु गावातील रेशन दुकानदार मनमानी करीत असल्याची ग्रामस्थांची तक्रार असून त्याविरोधात लवकरच तहसीलदारांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे काही ग्रामस्थांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सांगितले.
रेशन माल घेण्यासाठी दुकानावर गेले असता रेशन दुकानदार त्याच्या घरीच मशीनवर आमच्याकडून अंगठा घेऊन आम्हांला शासनाच्या निर्देशापेक्षा कमी माल देत आहे. याशिवाय दुकानातून रेशनमाल घेतल्याची पावती रेशन दुकानदार आम्हांला देत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार असून रेशन दुकानात आलेल्या मालाची नोंद तसेच मालाचा दर (भाव) असलेला फलक लावावा असे निर्देश असताना दुकानदार ते लावत नाही.अशीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सदर रेशन दुकानदार ग्रामस्थांची फसवणूक करीत असल्याने याबाबत या रेशन दुकानदाराची त्वरित चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे