खडसेवर ४०० करोड रूपयांचा घोटाळ्याचा आरोप : आ. चंद्रकांत पाटलांची चौकशीची मागणी
नागपूर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा | मुक्ताईनगर तालुक्यातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा आमदार एकनाथ खडसे यांच्या सौभाग्यवतींच्या नावे असणार्या जमिनीतून करण्यात आल्याचा गंभीर आरोप आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मांडत चौकशीची मागणी केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेवर गंभीर आरोप केलें जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली.
यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला.
या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.तसेच त्यांनी एसआयटीचे आश्वासन देखील दिले आहे.