रिक्षाचालकांच्या मनमानी भाडे वाढीचा प्रवाशांना आर्थिक फटका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी ते सावदा यागावाचे अवघे बारा किमी एवढे अंतर असून या करिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसमध्ये फक्त प्रति प्रवाशी २०रू भाडे आकारले जाते मात्र रिक्षाचालक प्रवाशांकडून प्रति प्रवाशी पन्नास रुपये भाडे आकारत असून एका प्रवाशामागे ३०रू अतिरिक्त घेत असून याचा आर्थिक भुर्दंड नाहक प्रवाशांना सहन करावा लागत आहे.तसेच कोरोना काळामध्ये सुरक्षित अंतरासाठी लागू करण्यात आलेली भाडेवाढ प्रवासीसंख्या पूर्ववत झाल्यानंतरही कायम असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र या सर्व गैर प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभाग स्वत:हून कारवाई करण्याऐवजी प्रवाशांच्या तक्रारीची वाट पाहत असल्याचे चित्र दिसत असल्याने रिक्षाचालकांना चांगलेच फावले आहे.
तसेच सावदा ते खिर्डी बस भाडे२०रू आहे.त्याच प्रमाणे रावेर ते खिर्डी २५रू भाडे असून रिक्षाचालक ५०रू प्रति व्यक्ती या प्रमाणे भाडे आकारले जात असून बस भाडे आणि रिक्षा भाडे यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे यावरून स्पष्ट जाणवत आहे.परिणामी, सामान्य नागरिकांना याचा नाहक भूर्दंड सहन करावा लागतो. विशेष म्हणजे,अनेकदा रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भाड्यासंदर्भात बाचाबाची होताना दिसते.ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे रिक्षाचालक भाड्याकरता मनमानी करतांना दिसतात. विशेषतः रात्रीच्या वेळी हेच दर दुप्पट-तिप्पट होत असतात.तसेच रिक्षाचालक युनिफॉर्म मध्ये दिसत नाहीत. रिक्षा चालवत असताना दर्शनी भागावर नियमानुसार बॅच लावणे बंधनकारक असतांनाही काहीजण अगदी बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करतात. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून रिक्षाचालक स्वत:च्या मर्जीने भाडे आकारणी करीत आहेत. याबाबत रिक्षा संघटना आणि आरटीओ विभागासह वाहतूक पोलिस लक्ष देतील का? दुर्लक्ष करतील याकडे प्रवाशांसह सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे.
बस स्टॅण्डवर बहुतांश रिक्षाचालक एकाच वेळी १०ते 12 प्रवाशांना कोंबत असतात त्यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सुध्दा ऐरणीवर येत आहे. लॉकडाउन काळात सुरक्षित अंतर राखण्यासाठी आणि रिक्षाचालकांचा तोटा होऊ नये यासाठी दोन प्रवासी घेऊन प्रति प्रवासी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जात होते.मात्र आताही रिक्षाचालक १३ते१४ प्रवासी कोंबून प्रति प्रवासी २०रुपयांऐवजी अवघ्या बारा किमी अंतरासाठी प्रवाशांना सध्या प्रति प्रवाशी ५०रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासी याबाबत संताप व्यक्त करत असून त्याचे पडसाद खिर्डी येथे उमटत आहेत. रिक्षाचालकांवर कोणाचाही अंकुश नाही का? रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारावर रिक्षा संघटना आणि आरटीओ तसेच वाहतूक विभागाचा अंकुश नसल्याने रिक्षाचालकांची अरेरावी वाढत आहे. रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक विभागाने पुढाकार घेवून कारवाई करणे गरजेचे असतांनाही जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असून प्रवाशांच्या तक्रारीची वाट पाहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तसेच रिक्षा स्थानकावरील रिक्षा चालक स्वतच्या मनमानीनुसार प्रवाशांकडून भाडे आकारणी तसेच उद्धटपणाने वर्तन करताना नेहमी दिसतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.