निंभोरा ते खिर्डी रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी खु.येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या विट भट्टया जवळ काही केळी व्यापारी दररोज केळीचे ट्रॅक, ट्रॅक्टर द्वारे माल भरत असून या ठिकाणी पडलेली पत्ती खराब व तुटलेली केळी,ची घाण ही रस्त्याच्या साईड ला टाकत आहे.तसेच सध्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे सदरील कचरा सडला असून या टाकलेल्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच स्टेशन रस्त्याने दररोज सकाळ व संध्याकाळी लहान मुले,महिला व जेष्ठ पुरूष हे फिरण्यासाठी जात असतात त्यातच रस्त्याच्या बाजूला टाकलेली घाण ही आरोग्यास हानिकारक असून त्यातून निघणाऱ्या विषारी वायू मुळे होणाऱ्या प्रदूषणाची धग वाढत चालली आहे.तसेच त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आधीच पूर्ण देश कोरोनाच्या संकटातून सावरत असतांना, सध्या डेंग्यू सारख्या आजाराने तोंड वर काढले असतानांच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर ठोस उपाय योजना करीत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी येत असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मात्र अतिशय त्रास होत आहे. शेजारीच हाकेच्या अंतरावर गाव, शाळा असून त्यांना एखाद्या संसर्गजन्य आजारांना तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.यावर स्थानिक प्रशासनाने त्वरित काळजीपूर्वक लक्ष देवून त्या ठिकाणी असलेल्या घाण कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी वाहन धारकांसह सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.