खिर्डी खु येथील नवीन गावठाण परिसरातील पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी खु येथील बलवाडी रस्त्यावरील नवीन गावठाण परिसरातील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला घाणीचा विळखा पडला असून. घाणीत असलेल्या टाकीतून पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यत आले आहे. व्हॉल्व्ह जवळच घाण असल्याने दूषित पाणी नळांना जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच गावातील नालीमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारची कल्पना देवूनही ग्रामपंचायत सदस्य मात्र काहीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावठाण परिसरात असलेली पाण्याची टाकी पूर्णत: असुरक्षित आहे. टाकीच्या सभोवताली कुंपण नसल्याने टाकीची सुरक्षा ही वाऱ्यासुरू आहे?सन २००० मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून २१वर्षात ग्राम पंचायत प्रशासनाने साधे तारेचे किंवा जाळीचे कुंपण करण्याची तसदी घेतली नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. या भागात गटार नसल्याने सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसून येथे पाणी साचत असल्याने डबके तयार झाले असून डासांची उत्पत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.तसेच सध्या डेंग्यू,मलेरिया,टायफाईड या सारख्या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येवू शकते तसेच या परिसरात असलेल्या घाणीची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.