खिर्डी येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यात पाणी साचल्याने तलाव सदृश परिस्थिती,वाहनधारकांचे हाल..
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी येथील बसस्थानक,व जेडीसीसी बँक परिसरात खिर्डी ते ऐनपुर रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने याठिकाणी रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून जणू काही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे की काय? असा गहन प्रश्न खिर्डी येथील ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांना पडला आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना दरवर्षी करावा लागत आहे.याकडे सम्बधित विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी पसरली आहे.
या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र या रस्त्याचे काम करत असताना या रस्ताचे काम योग्य त्या लेवलमध्ये न करताच संबंधीत ठेकेदाराने काम उरकून टाकले.तसेच रस्त्यावरच खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून पावसाळा सुरू झाल्यापासून पाणी साचल्याने याठिकाणी एकप्रकारे तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असल्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा याठिकाणी पाण्यातील रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार अनेक वेळा याठिकाणी पडल्याचे सांगितले जाते. तसेच पावसाळा सुरू झाल्यापासून हा डोह कायम असून याठिकाणी मच्छरांचा उन्माद आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र सम्बधित विभाग अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तिव्र संताप व्यक्त होत आहे.लवकरात लवकर या रस्त्यावरील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांनी केली आहे.