खिर्डी ते बलवाडी रस्त्यावरील मोठी काटेरी झुडपे ठरताहेत अपघातास कारणीभूत…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी,ता.रावेर, भिमराव कोचुरे । रावेर तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी रस्त्याला बहुतांश ठिकाणी कॉर्नर असल्याने समोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नसल्याने अनेक वेळा सदर कॉर्नरवर नेहमी अपघात होत असून अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी उपस्थित शेतकरी व वाहनचालकानी सांगितले.तसेच अवकाळी पावसामुळे काही महिन्यांपासून गवत व मोठी काटेरी झुडपे वाढली असून अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसत असल्याने रस्त्याच्या आजूबाजूला असणारी काटेरी झुडपे त्वरित काढण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
तसेच रावेर शहराला जाण्या-येण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून येजा करत असतात. तसेच काही ठिकाणी कॉर्नरवरच अनेक मोठी झुडपे वाढलेली आहेत.यामुळे समोरील येणारे वाहन अचानक आल्याने दिसत नाही.वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. संपूर्ण साईडपट्टयाच या गवत व झुडपांनी व्यापलेल्या असून आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेतमजूर यासह प्रवासी वाहने, वाहनधारक या रस्त्याने,नेहमी ये- जा करत असतात.त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरूच असते.परिणामी वाढलेल्या मोठया काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.या रस्त्याने लोकप्रतिनिधींचा वापर असतांनाही याकडे कोणीही लक्षच देत नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.