खिर्डी बु.येथे दारू विक्री दुकान परवाना परस्पर ठराव करून ग्रामस्थांची दिशाभूल,ग्रामविकास अधिकारी,सरपंच,सदस्य यांचा प्रताप!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। खिर्डी बु.येथे दिनांक 30/08/2021 रोजी ग्रामविकास अधिकारी व काही ग्रा पं सदस्य यांनी संगनमताने परस्पर दारू विक्रीचा परवाना मिळणेकामी लिहून घेतलेला ठराव रद्दबातल करणे बाबत खिर्डी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी रावेर यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, खिर्डी बुद्रुक ग्रा.पं यांची ग्रामसभा दि. 27/08/2021 रोजी चा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला होता.तसेच कोरम अभावी ग्राम सभा तहकुब करण्यात आली होती ती सभा तहकूब दि 30/8/2021 रोजी घेण्यात आली होती यात कोणताही विषय नसतांना किंवा चर्चा न करता जनाबाई काशिनाथ तायडे यांचे नावाने तांदलवाडी या गावी सुरू असलेले शासन मान्य देशी दारू चे दुकान खिर्डी बु येथील गट क्र ३८३ मध्ये जो गट नं. ग्राम. दप्तरी नाही किंवा एन. ए. नाही अशा भरवस्तीतील जागेवर नाहरकत परवानगी देण्याचा बोगस व खोटा ठराव ग्रामविकासअधिकारी विजयकुमार महाजन व काही ग्रा.प.सदस्य यांनी ग्रा. पं. दप्तरी खुल्या जागेवर ठराव लिहुन त्याच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव सो व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे कडे कारवाईसाठी पाठविला आहे.
यापूर्वी ग्रा.पं ग्रामसभा मध्ये गावात कोणतेही दारुचे परवाना दुकानास परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव घेण्यात आला आहे. तसेच महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा सुध्दा ठराव सुद्धा करण्यात आला आहे. सदरचा ठराव हा मिटिंग मध्ये न करता मागील बाजूने लिहुन घेतला आहे सदर ठराव रद्द बातल करून संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच यावेळी गावातील उपस्थित ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बोगस ठराव का? केला असा जाब विचारण्यासाठी ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन यांना ग्रामस्थांनी घेराव घातला त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी निंभोरा पोलीसं ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे , पोहेका स्वप्नील पाटील, बापू पाटील, व यांसह पोलीस कर्मचारी यांचा ताफा दाखल झाल्याने गर्दी ला पांगवण्यात आले. तसेच रावेर येथील गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल , विस्तार डी.एस. सोनवणे ,यांसह ग्रामपंचायती मध्ये येऊन रीतसर सर्व ग्रामस्थांना बोगस ठरावाच्या विरोधात अर्ज सादर करण्यासाठी ग्रामस्थांच्या समोर अवैधरित्या झालेला ठराव ना मंजुर करण्यासाठी व अवैध ठराव रद्द करून ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन व संबंधित ग्राम पंचायत सदस्य यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.तसेच गटविकास अधिकारी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करतील का?त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
खिर्डी या गावात या पूर्वी वैध व अवैध दारू विक्रीचा ठराव 2017 मध्ये होवून 1519 महीलान पैकी 885 महिलांनी मतदान करून खिर्डी गावातील बाटली आडवी केली होती त्यानंतर खिर्डी येथील दारू दुकाने सील करण्यात आली होती. परंतु पुन्हा ही वैध व अवैध दारू विक्री ची दुकाने काही दिवसाने पुन्हा सुरू झाली असल्याने परवाने धारक शासन मान्य देशी दारूचे दुकान खिर्डी येथे सुरू करण्यास ग्रामस्थांनकडून विरोध दर्शविला जात आहे.
प्रतिक्रिया.
खिर्डी मध्ये दोन वर्षा पूर्वी सुद्धा गावात दारूबंदी साठी मी व माझ्या परिवाराने तन मन धनाने पुढाकार घेतला होता परंतु गावात दारूबंदी होवून सुद्धा पुर्वी पेक्षा जास्त प्रमाणात दारू विक्री आज चालू आहे आज ठरावाला विरोध करणारे बहुतांशी लोक त्या वेळेस मला मूर्ख समजून हसत होते.गावात जेवढी अवैध दारू विक्री होत आहे. तर परवानाधारकांनी वैध व्यवसाय का? करू नये .
— किरण नेमाडे ग्रामस्थ खिर्डी बुद्रुक
झालेला ठराव हा बेकायदेशीर असून ग्राम विकास अधिकारी यांचा मनमानी कारभार आहे.
वैशालीताई पाटील ,
प्रभारी सरपंच खिर्डी बुद्रुक
यात ग्राम पंचायत सदस्यांनी आर्थिक चिरीमिरी करून गौडबंगाल केला असून यात जे सहभागी असतील त्यांच्या रितसर कारवाई करण्यात यावी
जगदीश कोचुरे माजी ग्रां. प. सदस्य खिर्डी बु.
ग्रा.प.मध्ये दारू दुकानाचा ठराव सभेमध्ये विषय न घेता ग्रा.वि.अधिकारी व काही ग्रा.पं सदस्य यांनी संगमत करूनई आर्थिक देवाण घेवाण झालेली दिसून येत आहे.याआधी सुद्धा काही तक्रारी केल्या आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारी यांचेकडून संबंधितांवर कुठलीही कार्यवाही होत नाही.
चंद्रजित पाटील-ग्रामस्थ खिर्डी बु
देशी दारू दुकानाला परवानगी ग्रा.पं.सदस्यांना न सांगता काही अधिकारी व काही सदस्य मिळून ठराव पास करून घेतला.व ग्रामस्थांची दिशाभूल केली.
निळकंठ पाटील
माजी ग्रा.पं सदस्य खिर्डी बुद्रुक