खिर्डी बु येथील सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत
मंडे टू मंडे वृत्तसेवा
खिर्डी ता.रावेर मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अनुचित प्रकार घडू नये,चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ तसेच गुन्हेगारी रोखता यावी यासाठी काही वर्षां पूर्वी खिर्डी बु ग्रामपंचायतीकडून लोक वर्गणीच्या माध्यमातून गावात ४ ते ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. परिणामी गावच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
खिर्डी हे १० ते १२ गावची मुख्य बाजारपेठ असून, दर मंगळवारी आठवडे बाजार याठिकाणी भरवला जातो. या ठिकाणी शाळा, कॉलेज, बॅंका तसेच बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठी दुकाने आहेत.त्यामुळे या भागात सतत नागरिकांची वर्दळ असल्याने पाकीट मारणे तसेच चोरी सारख्या घटना घडू नये यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.मात्र सदरील सीसीटीव्ही कॅमेरे हे तिसरा डोळा म्हणून काम पाहत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत होताना दिसत होती; परंतु सध्या गावात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बंद असल्याबाबत विचारले असता संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा हि देखभाल दुरुस्ती अभावी बंद असल्याचे समजत आहे.तसेच सबंधित प्रशासनाने बंद पडलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी व्यापारी वर्ग तसेच गावातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.