रिक्षा चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट,क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबून वाहतूक
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सावदा,रावेर या ठिकाणी कामानिमित्त नेहमी ये जा सुरू असल्याने अगदी १० ते १५ किमी अंतरावर असलेल्या सावदा रावेर या ठिकाणचे बस भाडे २० रू असून अवैध रिक्षा चालक मनमानी करीत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दुप्पट भाडे आकारत असून प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
या बाबत प्रवाशांनी विचारणा केली असता लगेच हमरी तुमरी करीत असल्याने प्रवाशांना गप्प बसावे लागते.या मुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे.तसेच ऑटो रिक्षामध्ये आसन क्षमते पेक्षा जास्त प्रवासी जनावरांप्रमाणे कोंबून भरले जात असून काही अपघात झाल्यास याला कोण जबाबदार राहणार असा प्रश्न प्रवाशांना नेहमीच पडतो.मात्र गरजेपोटी जीव धोक्यात घालून प्रवास करावाच लागतो.शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू असून याकडे आर्थिक हव्यासापोटी संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना?असा प्रश्न प्रवाशांसह सुज्ञ नागरिकांना पडत आहे.या कडे संबंधित विभागाने लक्ष देवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह प्रवाशांनी केली आहे.