खिर्डी येथे विजेचा लपंडाव सुरू असल्याने उकाड्यामुळे ग्रामस्थ हैराण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील विजउपकेंद्राअंतर्गत असलेल्या खिर्डी, रेंभोटा,धामोडी,वाघाडी या परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ वैतागले आहे.
ऐन कडक उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे.तसेच नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत.तसेच तासनतास रात्री बेरात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये रात्रीच्या नीरव शांततेत अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या सापांची व वन्य प्राण्यांविषयी भीती निर्माण झाली आहे. खिर्डी गावासह परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरतअसल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. ऐंनपुर विज उपकेंद्रातून बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.