खिर्डी येथील सौर पथदिवे देखभाल दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। खिर्डी खु येथील ग्राम पंचायत प्रशासनाने सुमारे एक ते दीड वर्षांपूर्वी बलवाडी रस्त्यावरील नवीन गावठाण परिसरात ऑटोमॅटिक चालू व बंद होण्याची सुविधा असलेले सौर पथदिवे बसविण्यात आले होते.त्यातील बॅटरी बॅकअप क्षमता ही १० ते १२ तास पुरेल इतकी असल्याने या सौर दिव्यांचे आयुष्य १० ते १५ वर्ष एवढे आहे.
यातील बॅटरीची देखभाल करण्याची अत्यंत आवश्यकता असते. एका सौर दिव्याची किंमत सुमारे १० ते १५ हजाराच्या वर आहे.तसेच याला विजेची आवश्यकता नसल्याने हे दिवे कुठेही कोणत्याही ठिकाणी बसविण्यास सोपे असून पर्यावरण उपयुक्त आहेत.मात्र याची योग्य ती देखभाल न केल्यामुळे बिकट अवस्था झाली आहे. तसेच नवीन गावठाण परिसराला लागूनच शेत शिवार असल्याने जंगली प्राणी,साप अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शांत वातावरणात फिरत असतात अचानक कुणाला काही कामानिमित्त गावात जायचे असल्यास अंधारातून येजा करावी लागते.
तसेच रात्रीच्या वेळेस सौर पथदिवे बंद अवस्थेत असल्याने कुणाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण राहणार? नवीन गावठाण परिसरातील रहिवाश्यांनी अनेक वेळा ग्राम पंचायत प्रशासनास बंद असलेले सौर पथदिवे दुरुस्त करून पुन्हा बसविण्यात यावे याबाबत सांगूनही जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे.तसेच ग्राम पंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी वेळकाढू पणामुळे कोरडी आश्वासन देवून सर्वसामान्य लोकांच्या तोंडाला पाने पुसत आहे.बंद अवस्थेतील सौर दिव्यांचा सर्वे करून त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गावठाण परिसरातील रहिवाशांनी केली आहे.