अनियंत्रित वृक्षतोडीमुळे गौरेया चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। २० मार्च हा दिवस विश्व गौरैया दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.एकेकाळी सर्वाधिक संख्या असलेला पक्षी म्हणून ओळख असलेली गौरेया नामक चिमणी हा पक्षी औद्योगिक क्रांतीच्या लाटेत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भारतात सर्वांत जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून गौरेया चिमणीची ओळख होती. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून, पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून, तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.
भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून गौरेया चिमणीची मूळ ओळख आहे. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, काड्या, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली चार ते पाच अंडी देते.असा सुंदर असलेला पक्षी आज दिसेनासा झाला आहे.तसेच ग्रामीण भागाचे होत असलेले शहरीकरण त्यामुळे होणारी अनियंत्रित वृक्षतोड यामुळे अनेक पक्ष्यांना घरटे बनविण्यासाठी सुरक्षित झाडे मिळत नाहीत. पीक पद्धतीत रासायनिक घटकांचा अतिवापर, तसेच कौलारू घरे कमी झाल्याने घराच्या वर जागा मिळत नसल्याने पक्ष्यांना सुरक्षित घरटे बनवता येत नाही. परिणामी, पक्षांची अंडी सुरक्षित राहत नाही. व पक्ष्यांचे पिल्ले जन्माआधीच मृत पावतात. त्यामुळेच अनेक पक्षी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी वृक्ष संवर्धन होणे गरजेचे आहे.