खिर्डी खु येथे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याची होतेय नासाडी,प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,भिमराव कोचुरे। खिर्डी खु येथील नवीन गावठाण परिसरात सन २००० या वित्तीय वर्षात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ लक्ष लिटर पाणी साठवणुकीची क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली. सदर पाण्याची टाकी पाण्याने पूर्ण भरली असता टाकी ओव्हर फ्लो होत असल्याने पिण्याचे स्वच्छ पाणी दररोज तासनतास गटारीत वाया जात असते.
तसेच गटारीची नियमित वेळेवर सफाई न झाल्यास गटारीचे दुर्गंधी युक्त घाण पाणी या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरते.या मुळे या ठिकाणी नदीचे स्वरूप प्राप्त होत असल्यामुळे हजारो लिटर पाणी गटारीत वाया जात आहे. आधीच कोरोना सारख्या रोगामुळे स्वच्छता राखणे गरजेचे असून घाण पाण्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने या डासांच्या चाव्यामुळे नागरिकांना विषाणूजन्य आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.मात्र गावात सकाळी एक वेळेस नळांना पाणी येते.ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्राम पंचायत प्रशासनाला गावात दोन वेळेस पाणी सोडण्याची अनेक वेळा मागणी केली मात्र ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली.तसेच गावात एकाच वेळेस नळाला पाणी सुटेल यामुळे ग्रामस्थांना सवय होईल असे सांगण्यात येते.मग हजारो लिटर वाया जाते त्याचे काय? जाणारे पाणी बंद होणार कधी? ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय पाणी साठवणूक करण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने दुपारच्या वेळेस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.जेणे करून ओव्हर फलो मुळे वाया जाणारे पाणी मुख्य पाइप लाइन ला जोडल्यास याचा नागरिकांना पुरेपूर फायदा होवून पाण्याची सुध्दा बचत होण्यास मदत होईल.वाया जाणाऱ्या पाण्यावर ग्राम पंचायत प्रशासनाने काळजी पूर्वक लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.