भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी येथील विटभट्टीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महसूल विभागाचे दुर्लक्ष

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ,ता.रावेर विशेष प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु येथील ग्राम पंचायत हद्दीतील निंभोरा ते खिर्डी रस्त्याच्या कडेला गावातील विटभट्टी व्यावसायिक यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपला विट बनविण्याचा व्यवसाय थाटला असून सदरील व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रदूषण नियंत्रक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांनी आपला व्यवसाय अगदी बिनदिक्कत पणे सुरू केलेला आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विट बनविली जात असून एकमेकांवर विटा रचून भट्टी तयार केली जाते.तसेच विटभट्टी पेटविण्यासाठी इंधन म्हणून दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साइड,कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन, यासारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन होते.यातील सल्फर डाय ऑक्साईड मुळे डोळ्यांचे विविध प्रकारचे विकार आणि हवेतील नायट्रोजन आणि कार्बन डाय ऑक्साईड मुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे विकार उद्भवतात.

तसेच या सर्व विषारी वायूमुळे विट भट्टयांच्या परिसरातील तापमानात वाढ होवून सभोवतालच्या शेतीवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.या सर्व कारणांमुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने विटभट्टी सुरू करण्यासंदर्भात नियम सक्तीचे केले आहेत.सदरील विटभट्टी चालक व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता विटभट्टी व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. तसेच विट भट्टी वरील कामगार हे रस्त्याच्या अगदी जवळच दगडी कोळशाचा बारीक चुरा आणि भट्टीतील राख चाळणी द्वारे चाळत असून राखेचे व दगडी कोळशाचे बारीक बारीक कण व धूळ हवेमुळे उडत असून वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने या ठिकाणी अपघात होवून जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदरील विट भट्टी चालकास सुज्ञ नागरिकांनी दोन वेळेस तोंडी समज दिली आहे तसेच खिर्डी खु येथील ग्राम पंचायत प्रशासनाने रितसर नोटीस देवूनही विट भट्टीचालक रस्त्याच्या कडेलाच राख व दगडी कोळशाची चाळणी करीत आहे. महसूल प्रशासन याकडे मुद्दामून दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे.अशा अवैध विट भट्टी चालकांवर महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांसह सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!