खिर्डी परिसरात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी परिसरात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून सध्या केळी पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणात पडला असून तालुक्यात एकही कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करत नाही असे शेतकर्यांमधून बोलले जात आहे.
शेतकरी कृषी केंद्रातून मिळेल त्या महाग भावात औषध विकत घेवून फवारणी करीत आहेत.या महागड्या औषधांनी शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. करपा रोग आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच अवकाळी पावसामुळे ज्वारी,उडीद, मूंग व कापूस उद्ध्वस्त झाल्यामुळे केळी पिकावर शेतकर्यांची आशा होती मात्र केळी पिकावर मोठ्या प्रमाणात करपा पडला असल्याने शेतकरी मात्र चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या शेतकर्यांना कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.