खिर्डी ते निंभोरा पर्यायी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य,किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (भिमराव कोचुरे)। खिर्डी ते निंभोरा येथे उड्डाण पुलाचे काम काही महिन्यांपासून सुरू असल्याने ठेकेदाराने खडी व मुरूम टाकून पर्यायी रस्ता बनविला मात्र या रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून जणू काही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे की काय? असा गहन प्रश्न खिर्डी येथील ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांना पडला आहे.
या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते.या ठिकाणी समोरून वाहन आल्यास एकमेकांना साईड देण्यासाठी जागा नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले.तसेच रस्त्यावरच खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून पावसाळा सुरू झाल्यापासून पाणी साचल्याने याठिकाणी एकप्रकारे तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असल्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा याठिकाणी पाण्यातील रस्त्यावरील खड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार अनेक वेळा याठिकाणी पडल्याचे सांगितले जाते. तसेच पावसाळा सुरू झाल्यापासून हि समस्या कायम असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तिव्र संताप व्यक्त होत आहे.लवकरात लवकर या रस्त्यावरील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी तसेच मुरूम टाकून खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांनी केली आहे.