उदळी ते हतनूर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर, भिमराव कोचुरे । उदळी ते हतनूर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून सावदा ते मुक्ताईनगर भागातील गावांना व राज्य मार्गाला जोडणारा एकमेव रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये असून या रस्त्याने शालेय विद्यार्थी,शेतकरी,इतर वाहन धारक नेहमी येजा करत असतात तसेच ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.विशेषतः समोरून वाहने आल्यास एकमेकांना साईड देण्यास जागा नसल्याने या ठिकाणी अपघात घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे वाहन धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहे. सदरील रस्त्यावर नेहमी छोटेमोठे अपघाताला सामोरे जावे लागत आहे.अत्यंत बिकट परिस्थिती उद्भवलेली असतांना देखील संबंधित विभागा कडून याकडे दुर्लक्ष होत असून रस्त्यावरील खड्डे बुजविणे अत्यंत गरजेचे असून संबधित विभाग एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का? असा प्रश्न वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केलेली आहे.