बलवाडी- तांदलवाडी रस्त्याच्या दुतर्फाची काटेरी झुडपे काढली : बातमीची दखल
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। तांदलवाडी ते बलवाडी या ५ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व गवत मोठया प्रमाणात वाढले होते.या रस्त्याने शेतकऱ्यांचा व वाहनधारकांचा मोठा प्रमाणात वापर असून केळीची ट्रकद्वारे या रस्त्याने वाहतूक केली जाते.आधीच रस्ता अरुंद असून काटेरी झुडपे रस्त्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.
सदरचा रस्ता हा रावेर शहराला जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून जात असून वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी,शेतमजूर यासह प्रवासी वाहने, वाहनधारक या रस्त्याने निंभोरा, खिर्डी, ऐनपूर यासह अनेक गावांना जा- ये करत असतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरूच असते.परिणामी वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना अडचणी येत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.तसेच काटेरी झुडपे लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह वाहनधारकांनी केलेली होती याबाबत वाहन धारकांनी व शेतकऱ्यांनी मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी यांचेकडे कैफियत मांडली असता याबाबत दि.१३जुलै रोजी मंडे टू मंडे ने वृत्त प्रसिद्ध केले असता सदर वृत्ताची तात्काळ दखल घेत रस्त्याच्या दुतर्फा असलेले काटेरी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले असून वाहनधारकांनी व शेतकऱ्यांनी मंडे टू मंडे न्यूज चे व माजी जि.प उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नंदकिशोर महाजन यांचे आभार मानले.