खिर्डी येथील लाभार्थ्यांना घरकूल मिळणार कधी? ग्रामस्थांचा सवाल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। शासनाने गोरगरीब लोकांचे घराचे स्वप्न साकार होण्यासाठी रमाई घरकूल योजना, पंतप्रधान घरकूल योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेंअंतर्गत गोरगरीब लोकांना सुद्धा हक्काचे पक्के घर मिळावे या साठी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र खिर्डी खु. ग्रामपंचायत प्रशासनाने वर्षभरापासून रमाई घरकूल योजना व पंतप्रधान घरकुल योजनेचे ड प्रपत्र संबंधी ऑनलाईन प्रस्ताव रावेर पंचायत समिती कार्यालयात दाखल आले आहे.परंतु पंतप्रधान घरकुल योजनेचे प्रस्ताव अद्यापही शासन दरबारी धूळखात पडून आहेत. सदर ड प्रपत्रचे प्रस्ताव केव्हा मंजूर होईल? व लाभधारकांना त्यांचा लाभ मिळतो की नाही याकडे खिर्डी खु येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
खिर्डी खु येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सन २०२०-२१या वित्तीय वर्षात पंतप्रधान घरकूल योजनेचे प्रपत्र ड चे २४१ लाभधारकांचे प्रस्ताव ऑनलाईन करून ऑगस्ट महिन्यात रावेर पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. सदरील प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाने तब्बल एक वर्षापासून दाखल केले आहेत. मात्र या घरकूल प्रस्तावावर शासनाकडून अद्यापही विचार करण्यात आला नसून हे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. खिर्डी खु येथील ग्रामस्थांची पंतप्रधान घरकूल योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यात आली होती. त्या यादीवरून लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतची घरपट्टी भरून पंतप्रधान घरकूल योजनेचे प्रपत्र ड ऑनलाईन प्रस्ताव भरून ग्रामपंचायतमध्ये दाखल केले होते. मात्र मागील वर्षभरापासून पंतप्रधान आवास योजनेच्या एकाही लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. सदरील लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार कधी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारून लाभार्थी मेटाकुटीस आले आहेत.जिल्ह्यामध्ये रमाई घरकूल योजना व पंतप्रधान घरकूल योजनेसाठी अद्यापही निधी प्राप्त झाला नाही. या घरकूल योजनेला जळगांव जिल्ह्यामध्ये निधी प्राप्त झाल्यावर आपण दाखल केलेल्या घरकूल यादीच्या लाभार्थ्यांना घरकूल निधी मिळेल, असे ग्राम विकास अधिकारी गोकुळ सोनवणे यांनी सांगितले आहे. घरकूल मिळतील या आशेने मागील वर्षभरापासून गोरगरीब लाभार्थी वाट पाहून थकले आहेत. लाभार्थ्यांनी घरकूल मिळण्याची आशाच सोडून दिली आहे. घरकूल लाभार्थ्यांना त्वरित घरकूल मिळावेत अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांसह लाभार्थ्यांनी केली आहे.