खिर्डी खू येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य सेविका मिळेल का?ग्रामस्थांचा सवाल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे, भिमराव कोचुरे। निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या खिर्डी खु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेविकेची दोन ते तीन महिन्यापासून बदली झाली आहे. आरोग्यसेविका हे पद रिक्त असून या बाबत मागणी करण्यात आली परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने गावक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
खिर्डी खु.या गावाची ७ हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात एक उपकेंद्र आहे. त्यात खिर्डी सोबत रेंभोटा,वाघाडी,भामलवडी,पुरी गोलवाडे,शिंगाडी असे अनेक गाव वस्त्या आहेत. त्यामुळे आरोग्यसेविका नसल्याने रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी येथून ३ ते ४ किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने त्यांची हेळसांड होते. तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने येथे एक तरी आरोग्यसेविका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तसेच सध्या कोरोनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तरी सुध्दा आरोग्य उपकेंद्र कर्मचारी व अधिकारी जाणीव पुर्वक याकडे दुर्लक्ष करीत असून या उपकेंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडेही आरोग्य विभागाचे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. हा रामभरोसे कारभार थांबवून वरिष्ठांनी येथील रिक्त पद तात्काळ भरावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
” रिक्त पदे ही जिल्हा स्तरावरून भरण्यात येतात.याबाबत दरमहा रिपोर्ट पाठविले जातात. खिर्डी येथे तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सेविका दिली होती. परंतू त्यांची बदली झाल्याने आम्ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना तेथील पद भरण्याचा प्रयत्न करू” —
डॉ.विजया झोपे. रावेर
तालूका आरोग्य अधिकारी