अवैध दारू विक्री बंद साठी खिर्डीत संतप्त महिलांचा एल्गार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी : खिर्डी येथे अवैधरित्या देशी व गावठी दारुची मोठ्या प्रमाणात बसस्टँड परिसरात व गल्लीबोळात ठिकठिकाणी अगदी बिनधास्त पणे खुलेआम विक्री होत आहे.
२८ सप्टें २०१७ रोजी खिर्डी येथे अवैध दारू विक्री विरोधात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली असता दारुची बाटली आडवी झाली होती. ग्राम पंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला बचत गट,यांनी पुढाकार घेवून अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती.मात्र गावात पुन्हा दारू विक्री सूरू झाल्याने गावातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला. गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर दारू विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करून फक्त काही मर्यादित काळासाठी दारू विक्री बंद ठेवतात.तसेच पुन्हा ” जैसे थे ” ची परिस्थिती पाहवयास मिळते.दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नाही,कारण त्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा व खिर्डी येथील दारूबंदी समितीचे सदस्य स्वतः अवैध दारू विक्री करीत आहे.असा आरोप महिला व ग्रामस्थांकडून केला जात आहे,या मुळे दारूबंदी समिती आणि स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे.
ज्यावेळेस व्यसनी व्यक्ती जवळ दारू पिण्यास पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती,आपल्या मुलाबाळांना,पत्नीला व आई वडिलांना अगदी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करतात.तसेच घरातील धान्य,भांडी,विकून आपला शौक पूर्ण करण्यात धन्यता मानतात.तसेच आजची युवा पिढी दारुच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. व काही तरुण गावठी दारूमुळे सुजून फुगून मरण पावले आहेत त्यातच २५ ते ३० वयोगटातील महिला विधवा होत असून घरातील कर्ता पुरूष गेल्याने या महिलांना घराचा रहाट गाळा कसा चालवावा? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावतो.ही आजची वस्तू स्थिती आहे. खिर्डी परिसरात सुरू असलेल्या गावठी दारू विक्री व दारू निर्मितीच्या भट्टीवर कारवाई करून उद्धवस्त करण्यात यावी अशी मागणी खिर्डी येथील महिलांनी केली या वेळी महिलांचे रौद्ररूप पाहून उपस्थित सर्वच आवक झाले.निंभोरा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर व गावठी दारू भट्टयांवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महिलांना दिले.यावेळी खिर्डी बीट अंमलदर राजेंद्र पाटील,पो.हे.का.विकास कोल्हे, पोलीस पाटील,प्रदीप पाटील, ग्राम पंचायत सदस्य, पवन चौधरी, ऊषा बाई पाटील, साधनाबाई कोचुरे,दगुबाई शिरनामे, नंदाबाई गुरव,शालिनी भालेराव,सौ.वैशाली कोळंबे,सुलोचानाबाई भंगाळे,मुकेश कोचुरे, राजेंद्र कोचुरे, पत्रकार,प्रदीप महाराज, कांतीलाल गाढे, विनायक जहुरे,भिमराव कोचुरे,संकेत पाटील,सादिक पिंजारी, आदी मान्यवर उपस्थित होते.