साने गुरुजी विद्याप्रबोधिनी शिक्षणशास्त्र महाविद्यालय खिरोदा येथे बहिणाबाई चौधरी जयंती व विद्यापीठ स्थापना दिवस साजरा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिरोदा, मंडे टू मंडे वृत्तसेवा। जनता शिक्षण मंडळ संचलित साने गुरुजी विद्या प्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव नामविस्तार दिन, कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती आणि विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयात साहित्य वाद-विवाद मंडळातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सा. त्र्यं. भुकन होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाची सोय भागवली अल्प कालावधीत विद्यापीठाने घेतलेली भरारी, प्रगती कौतुकास्पद आहे. विद्यापीठाच्या स्थापने मध्ये कै. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे योगदान
मोलाचे आहे. कवयित्री बहिणाबाईंच्या काव्याचा थोडक्यात आढावा घेतला.
प्रमुख अतिथी डॉ. दीपक सूर्यवंशी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांनी ‘कवयित्री बहिणाबाईंच्या काव्यातील जीवनविषयक तत्त्वज्ञान ‘ या विषयावर सोदाहरण मार्गदर्शन केले. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवन विषयक काव्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. बहिणाबाई ह्या निरक्षर असल्या तरी त्यांनी मिळवलेले अनुभवातील शहाणपण एखाद्या उच्चविद्याविभूषित विद्वान व्यक्तीपेक्षा मोठे होते. त्यांनी मांडलेले गहन विषयांवरील तत्त्वज्ञानाची भुरळ आजही काव्य रसिकांच्या मनावर कायम आहे. म्हणूनच त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य वाद-विवाद मंडळ प्रमुख डॉ. प्रतिभा सूर्यवंशी यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन डॉ. एन एन लांडगे यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.