‘त्या’ एफआयआरमुळे संजय पांडेंच्या निलंबनाची मागणी, सोमय्यांची राज्यपालांकडे तक्रार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील खार पोलीस ठाण्यासमोर झालेल्या हल्ल्याची माहिती राज्यपालांना देत तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर बोगस एफआयआर प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याप्रकरणात निश्चित चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पांडे यांना ताबडतोब निलंबित करायला हवे. खार पोलिसांनी एफआयआरवर कुणाचीही सही नसल्याचे मान्य केले आहे. हे एफआयआर अस्तित्वातच नाही. सरकार आणि आयुक्त कसे बनवाबनवी करत आहेत, हे यावरून दिसते. शिवसेनेच्या 70-80 कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी हे केले गेले. खरी एफआयआरही घेतली जात नाही. उध्दव ठाकरे यांची आयुक्त चमचेगिरी करत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. कमांडोंनी माझी गाडी बाहेर काढली. दगडामुळे काच फुटली. ती काच तोंडाला लागली. जखम छोटी होती. त्यामुळे थोडं रक्त आलं. माझ्या जीवाला धोका आहे, असं मी सांगितलं होतं. पण त्यानंतरही पोलिसांनी जायला सांगितलं. मी थोडक्यात वाचलो. असंही सोमय्या म्हणाले.
दरेकर यांनी पोलिसांमार्फत दहशतवाद पसरवला जात असल्याचे सांगितले. किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यांच्याच चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सोमय्या हे अचानक गेले नव्हते. तिथल्या पोलिसांची जमाव पांगवण्याची आवश्यकता होती. मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून हे सर्व सुरू होतं. सर्व अधिकाऱ्यांवर दबाव होता. सोमय्या यांना झेड सुरक्षा असूनही हल्ला होत आहे, मग सर्वसामान्य माणसांनी कसं जगायचं.
झेड सुरक्षा नसती तर हत्या झाली असती. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे शेवटची आशा म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. राज्यपालांनी या प्रकरणाची चौकशी करून गृह सचिवांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी केल्याचे दरेकरांनी सांगितले. सोमय्या यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि वकिलांनी राज्यपालांची भेट घेतली.