“ठाकरे सत्तेचा बाबरी ढाचा देवेंद्रच खाली आणेल, वाघ एकच नरेंद्र मोदी – फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : “कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’, असा जोरदार पलटवार फडणवीस यांनी केला.
‘जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार. मी जेव्हा म्हणालो रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली? अरे मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी मस्जिद गिरा रहा था, तुझे मिरची लगी तो मै क्या करु? अरे हा, मी बाबरी पाडण्याकरता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. उद्धवजी 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता’अशी टीका फडणवीस यांनी केली.
तसेच, “काल छत्रपती संभाजी महाराजांची देखील जयंती होती आणि भगवान नृसिंहाची देखील जयंती होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचं पोट फाडलं असे भगवान नृसिंह या दोघांची काल जयंत होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी, ओझस्वी ऐकायला मिळेल. काहीतरी असं बोललं जाईल की जे ऐकूण आम्ही हलून जाऊ. मात्र लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. एकही नवीन गोष्ट आम्हाला ऐकयला मिळाली नाही.” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर, “कालच्या भाषणात आमचे एक मित्र सांगत होते, शंभर सभांची बाप सभा. खरंच आहे १०० कोणासोबत होते? कौरवांसोबत होते. पांडवासाोबत पाच होते. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
“आताच आपण हनुमान चालीसा पठण केली. हनुमान चालीसा तर आमच्या हृदयात असते. परंतु हे जे रवी राणा, नवनीत राणा आहेत ना यांना समजतच नाही, की हनुमान चालीसेच्या दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला अगोदरपासूनच माहीत आहेत आणि केवळ त्या दोन ओळींवरच ते काम करत आहेत. कोणत्या दोन ओळी, राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसा रे… यामुळेच २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रींना ५० लाखांचं घड्याळ देखील दिलं.माझा प्रश्न आहे की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल का? की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीस म्हणणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार असेल, त्यांनी कधी विचार केला असेल का?” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा