घरात वडिलांचा मृतेदह,डोळ्यात अश्रू ,आणि दिली दहावीची परीक्षा, हृदय पिळवटून टाकणारी घटना
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
लातूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मंगळवारपासून राज्यभरात इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात शिक्षणात खंड पडल्यानंतर पुन्हा एकदा शाळा गजबजल्या आहेत. पण ऑनलाईन परीक्षेची सवय लागल्यानंतर आता लेखी परीक्षा देणं विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. अशात लातूर जिल्ह्यातील चापोली याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका विद्यार्थ्यानं घरी वडिलांचा मृतदेह असताना देखील त्यानं परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीची परीक्षा दिली आहे.
घरात वडिलांचा मृतदेह असताना परीक्षाला गेल्यानं संबंधित विद्यार्थ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मनात भावनिक घालमेल सुरू असताना देखील त्यानं मराठी भाषेची परीक्षा दिली आहे. सूरज तातेराव भालेराव असं संबंधित विद्यार्थ्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरजचे वडील तातेराव किसनराव भालेराव,वय 46 मागील काही दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचारही केले जात होते. पण त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नव्हता.
अशात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी पहाटे तातेराव याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दुसरीकडे सूरज दहावीला असल्याने मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता. परीक्षेला जायचं की नाही, याबाबत तोही गोंधळलेल्या अवस्थेत होता. पण नातेवाईकांनी त्याला धीर दिला आणि परीक्षेला जाण्यासाठी तयार केलं. तसेच परीक्षेहून आल्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.