बस स्थानकात एसटी बस चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
लातूर,वृत्तसंस्था। काही दिवसापूर्वी संगमनेर बस स्थानकात एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आणखी एका बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरची आत्महत्या
अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरची आत्महत्या
याआधीही एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.