बनावट दस्तावेज तयार करून प्लॉट खरेदी देणाऱ्या टोळीच्या सुत्रधारास अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बनावट दस्तावेज तयार करून प्लॉट खरेदी देण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून मुख्य सूत्रधारास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या कडून फसवणुकीची रक्कम ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आली आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनला शीतल सुनीलकुमार पाटील नाव असलेली एक व्यक्ती, एक तोतया महिला, एक अनोळखी इसम (वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष दरम्यान), पुंडलिक काशिनाथ पाटील, अक्षय आधार बडगुजर यांच्या विरुद्ध २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पाचोरा सह.दुय्यम निबंधक सतेज सखाराम भास्कर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनी संगनमत करून जारगाव शिवारातील जागा मूळ मालक शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड वापरून मूळ मालकाऐवजी दुसरी महिला उभी करून सह. दुय्यम निबंधक कार्यालय, पाचोरा येथे बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा वापर करून आणि २ (दस्त क्र. ६९५७/२०२४) २,८५, ००० रुपये किमतीला नगराज गोविंदा अहिरे यांना खरेदी खत केले. यातून शासनाची व मूळ मालक शीतल सुनीलकुमार पाटील तसेच नगराज गोविंदा अहिरे यांची फसवणूक केली होती.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी अनोळखी पुरुष (वय ३० ते ३५ वर्ष) हा गुन्हा केल्यापासून फरार होता. याचा तपास सुरू असताना त्याला जारगाव चौफुली येथे पोलिसांनी पकडले.त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवी करीत चुकीचे नावे सांगितले. विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव संतोष भिला सोनवणे (वय ३७, रा. नांद्रा, ता. पाचोरा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल करत फसवणुकीची रक्कम रोख ५ लाख रुपये तसेच बनावट आधारकार्ड, सातबारा उतारा, खरेदी खताच्या नकला इ. दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केले.
अटकेतील आरोपी संतोष भिला सोनवणे सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. संशयिताने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पाचोरा पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, ज्ञानेश्वर महाजन, राहुल शिंपी, विश्वास देशमुख, योगेश पाटील, सागर पाटील, जितेश पाटील यांच्या पथकाने केली.