यावल तालुक्यातील पाडळसे गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
पाडळसे. ता. यावल. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | सध्या बिबट्या गाव व शेत शिवारात फिरताना दिसत आहे यावल तालुक्यातील किनगाव,सकाळी, डोंगर कठोरा आदी गावात तसेच रावेर तालुक्यातील कुसुंबा आदी गाव शेत शिवारात बिबट्याचा वावर दिसून आला. , यावल तालुक्यातील पाडळसे गावातील गट क्रमांक 1234 व गट क्रमांक 843 या शिवारात मंगळवार, दि. 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थ लीलाधर रवींद्र चौधरी यांनी दिली.
ही घटना घडताच ग्रामपंचायत सदस्या सौ. पुनमताई पाटील यांनी तातडीने वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक (आर.ओ.) अतुल तायडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अतुल तायडे व रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान बिबट्याचे स्पष्ट पायाचे ठसे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वन विभागाकडून लवकरच पथकाच्या माध्यमातून पुढील तपासणी व उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे.
दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.