बिबट्या थेट गावात, गायीचे वासरु केले फस्त, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावात “बिबट्या”ची दहशत
सुकळी, ता. मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. ज्ञानेश्वर सावळे | मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी परीसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असुन ग्रामस्थामध्ये धास्ती पसरली आहे. सुकळी येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट गावात घुसुन, गायीच्या वासराला फरफटत नेऊन गावाशेजारील केळीबागेच्या बांधावरती वासराला फस्त केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुकळी येथील पशुपालक तथा गुराखी नामदेव तुकाराम इंगळे 21 मे रोजी पहाटे गुरांच्या वाड्यात चारापाणी करण्यासाठी गेले असता, एक वासरु गोठ्यात नसल्याचं लक्षात आलं, आजु-बाजुला पाहणी केली असता, ओढत नेले असल्याच्या खुणा आढळुन आल्या. त्यांनी शोध घेतला असता,शेजारील असलेल्या जिजाबराव पाटील यांच्या केळीबागेच्या बांधावर सदर वासराचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळुन आला.तसेच आजुबाजुला बिबट्याच्या पाऊलखुणा आढळुन आल्या. समोरील प्रकार पाहुन त्यांना कळुन चुकले कि बिबट्याने वासरु फस्त केले आहे. सकाळी घटनास्थळावर नामदेव इंगळे,बापु पाटील, पोलीस पाटील संदीप इंगळे , सोपान न्हावी यांच्यासह काही ग्रामस्थ गेले असता,बिबट्या तिथच झुडपांत लपलेला होता. ग्रामस्थांची चाहुल लागताच एक मोठी छलांग मारत तेथुन बिबट्याने पळ काढला. यामुळे पोलीस पाटीलसह इतर ग्रामस्थांचा भीतीने थरकाप उडाला.
या घटनेमुळे सुकळी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन मजुर वर्ग केळीबागेतील शेतीकामांना धास्तावला असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वडोदा वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली डोलारखेडा वनपाल गणेश गवळी,वनरक्षक जी बी गोसावी, वनरक्षक रजनीकांत चव्हाण, अतिरीक्त पशुधन विकास अधिकारी डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस पाटील संदीप इंगळे आदींनी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. घटनास्थळी वनविभागाचे ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.
वनविभागाकडुन ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे . तसेच वन्यप्राण्यांबाबतची माहीती, फोटो विडीओ सोशल मीडिया द्वारे पसरवू नये. असे त्यांनी मुंडे टु मुंडे न्यूज च्या प्रतिनीधी शी बोलतांना सांगितले.
महीनाभरापूर्वी सुकळी येथील सुनिल ओंकार डापके याच्या घरासमोरील रविंद्र नाना पाटील यांच्या केळीबागेतुन येत गोऱ्हा जखमी केला होता केल्याची घटना घडली होती.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती
असाच प्रकार दोनवर्षापुर्वी शेजारील बापु प्रल्हाद पाटील यांच्या गोठ्यातील म्हशीचे पारडु बिबट्याने अशाच पद्धतीने फस्त केले होते.