यावल

दहिगाव – सावखेडासिम – मोहराळा शिवारात बिबट्याने दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील दहिगाव, जामुनझिरा, सावखेडासिम आणि मोहराळा शिवारात बिबट्याने दहशत पसरवली आहे. नुकताच दहिगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवारात, २३ मार्च रोजी रात्री सात वाजता बिबट्या आढळून आला.

माजी पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांनी त्याचे छायाचित्र टिपले असून त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबतची माहिती दिली. शेखर पाटील हे स्कूटीवरून आपल्या शेतात जात असताना बाबुराव नामदेव महाजन यांच्या शेताजवळ रस्त्यावर बिबट्या अचानक समोर आला. स्कूटीच्या प्रकाशात त्याचा चमकता डोळा दिसल्याने त्यांनी त्वरित अंतर राखत मोबाईलच्या झूम कॅमेऱ्यात त्याचे छायाचित्र टिपले आणि वनविभागाला माहिती दिली.

बिबट्याच्या दर्शनाने रात्रपाळी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या मका आणि भुईमूग काढणीची तसेच कांदा काढणीची कामे सुरू आहेत. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत, परिणामी शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतीकामे करावी लागत आहेत.

२२ मार्च रोजी रात्री मोहरला मोहराळा शिवारा स्मशानभूमी लगतही बिबट्या आढळून आला होता. त्याआधी जामुनझिरा शिवारातील नदीकिनारी आणि पंकज महाजन यांच्या शेताच्या बांधावर देखील बिबट्याचा वावर पाहिला गेला आहे. या वाढत्या हालचालींमुळे वनविभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी नागरिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!