योगींनी करुन दाखवलं, एक आदेश अन् १२५ लाऊड स्पीकर्स हटवले
लखनऊ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशभरात भोंग्यांचा मुद्दा तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यासंदर्भात आदेश काढला. त्यानंतर राज्यात स्वत:हून तब्बल १७ हजार भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. त्याबरोबर श्रीकृष्ण जन्मभूमीसह १२५ ठिकाणचे भोंगे हटवले गेले आहेत.
देशभरात धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे उतरवण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेत आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात विविध सरकारांच्यावतीन विविध आदेश लागू करण्यात आले आहेत.उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ सरकारनं राज्यातील धार्मिक स्थळांवरील अवैध ध्वनीक्षेपक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. या आदेशावरील कार्यवाहीचा अहवाल ३० एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अवनीश अवस्थी यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील अवैध ध्वनीक्षेपक हटवण्यासंदर्भातील आदेश शनिवारी देण्यात आल्याची माहिती दिली. पोलिसांना धार्मिक नेत्यांशी चर्चा करुन त्यांच्या समन्वयानं ध्वनीक्षेपक हटवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे अपर पोलीस महानिदेशक प्रशांत कुमार यांनी आतापर्यंत १२५ ठिकाणांवरील अवैध ध्वनीक्षेपक उतरवण्यात आल्याची माहिती दिली. तर, १७ हजार लोकांनी स्वत:हून ध्वनीक्षेपकाचा आवाज कमी करण्यास पुढाकार घेतल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सणांच्या दिवशी कार्यक्रमात माईकचा वापर केला जाऊ शकतो, असे आदेश दिले होते. मात्र, ध्वनीक्षेपकाचा आवाज कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या बाहेर जाऊ नये,याची दक्षता घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय नव्या ठिकाणी ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय धार्मिक शोभायात्रा आणि इतर कार्यक्रम विना परवानगी आयोजित करण्यात येऊ नयेत, असे आदेश देखील देण्यात आले आहेत.