नाशिक

अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न : हॉटेल चालकांवर गुन्हा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चक्क व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस ठेवून एका प्रसिद्ध लॉजमध्ये जीव देण्याचा प्रयत्न  एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील हॉटेल व्यवस्थापकाविरोधात बेकायदा प्रवेश दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, देवळा शहरातील या प्रेमीयुगुलाचे एकमेकांवर प्रेम आहे. सुरुवातीला मैत्री झाली आणि त्यातून प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, दोघेही अल्पवयीन. त्यामुळे आपला काही विवाह होणार नाही. आपल्याला एकत्र राहता येणार नाही. एकत्र जगता येणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे दोघांनाही नैराश्याने ग्रासले होते. हे पाहता त्यांनी आपण सध्या एकत्र जगू शकत नाही. मात्र, मरू शकतो म्हणत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देवळा इथल्या प्रसिद्ध अशा वेलकम हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेट्स ठेवले. त्यानंतर एक विषारी औषध प्राशन केले. मात्र, या दोघांच्याही मित्रांनी हे व्हॉट्सअॅपस्टेटस पाहिल्याने तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला. याप्रकरणी अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये कसलीही ओळखपत्र न घेता रूम दिली म्हणून हॉटेल व्यवस्थापक दीपक सुभाष अहिरे (रा. चिराई, ता. बागलाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून या अल्पवयीन प्रेमीयुगलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळा येथील हॉटेल वेलकम हे सुनील आहेर यांच्या मालकीचे असल्याचे समजते. ते त्यांनी दीपक आहिरेला भाडेतत्त्वार चालवायला दिले होते. आहिरेसोबत तसा करारनामाही केला आहे. मात्र, आहिरेने अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये रूम द्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी कुठलेही ओळखपत्र मागितले जायचे नाही. त्यांच्या नावाची नोंदही रजिस्टरमध्ये ठेवली जायची नाही, असे प्रकार सुरू होते. त्यामुळे अनेक अल्पवयीन जोडपे या हॉटेलमध्ये असे वारंवार येत असतात, असे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आहिरेवर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!