महाविकास आघाडीला झटका, काँग्रेसची मतं फुटली,महायुतीची सर्व उमेदवार विजयी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जवळ जवळ आता समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा असा नऊच्या नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे.मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीने महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत. त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यात काँग्रेसची मतं फुटल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीचे केवळ 3 उमेदवार होते. यापैकी काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे विजयी झालेले आहेत. या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला असून ते पराभूत झाले आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसचे 5 मते फुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडे 42 मतं होती. पण अजित पवार गटाला 47 मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची 5 मतं फोडण्यात अजित पवार गटाला यश मिळालं आहे. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होती. याशिवाय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आपल्या पक्षाचे तीन-चार मतं फुटतील, असं कैलास गोरंट्याल उघडपणे म्हणाले होते.
भाजपचे विजयी उमेदवार –
1) पंकजा मुंडे – 26 मतं
2) परिणय फुके – 23 मतं
3) सदाभाऊ खोत – 26 मतं
4) अमित गोरखे – 23 मतं
5) योगेश टिळेकर – 23 मतं
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं
2) राजेश विटेकर – 24 मतं
शिवसेना विजयी उमेदवार
1) कृपाल तुमाने – 25 मतं
2) भावना गवळी – 24 मतं
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 25 मतं
शिवसेना ठाकरे गट
1) मिलिंद नार्वेकर – 24 मतं