मोबाईलसाठी दहावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास; विचार करायला लावणारी घटना !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अहमदनगर (वृत्तसेवा) : नवीन मोबाईल घेवून न दिल्याने दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने रागाच्या भरात राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवार (ता.३) रात्री ८ च्या सुमारास खंडोबानगर शेवगाव येथे घडली. ओम दत्तात्रय वाघ (वय-१६) असे मृताचे नाव असून त्याचे मामा सुनिल म्हस्के यांच्या खबरीवरुन पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शहरात एकाच आठड्यात दहावीत शिकणा-या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे. मुलं मोबाईलसाठी मृत्यूला कवटाळत असतील तर दोष कोणाचा… ?
या बाबत समजलेली माहिती अशी की, ओम वाघ हा शहरातील भारदे विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. शाळेत तो हुशार व होतकरु विदयार्थी म्हणून सर्वांना परिचित होता. तो वडीलांना व्यवसायात मदत करायचा, त्यामुळे त्याचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांने वडिलांकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी वारंवार मागणी केली होती. वडिलांनी येत्या गुढीपाडव्याला नवीन मोबाईल घेवून देण्याचे त्यास आश्वासन दिले होते. मात्र, त्याचे समाधान न झाल्याने ओम याने बुधवारी राहत्या घरातील छताला कंबरेच्या बेल्टच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर शहरातील अमरधाममध्ये त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. पो.ना. सुधाकर दराडे पुढील तपास करीत आहेत. त्याच्या मागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अहमदनगर
–