अजित पवार दिल्लीला रवाना …
पुणे|मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. या घडामोडी पाहता ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटणार तर नाहीत ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या आहेत. त्यानंतर आज दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात सध्या प्रचंड हालाचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई आता निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या समोर आणि सुप्रीम कोर्टातही सुरु आहे. असं असताना आज अचानक पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी मोठ्या हालचाली घडल्या. त्याआधी आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट घडून आली. त्यानंतर दुपारी प्रतापरावर पवार यांच्या घरी दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. या भेटीनंतर आता आणखी पुढे काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अजित पवार पुण्यातहून थेट दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सणात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फटाके फुटण्याचे संकते मिळताना दिसत आहेत.
या सर्व घडामोडींना प्रत्यक्षपणे आणि उघडपणे आज सकाळी सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. पण दोन मोठे नेते एकत्र येणार आणि राजकीय चर्चा होणार नाही, असं शक्यच नाही. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज दुपारी पुण्यात बाणेरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांचं बाणेरमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकजण आले होते.
- अजित पवार दिल्लीला रवाना :
विशेष म्हणजे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चांनंतर घडामोडी इथेच थांबलेल्या नाहीत. कारण आणखी महत्त्वाच्या गोष्टी कदाचित दिल्लीत घडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळेच अजित पवार अचानक प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानाहून पुणे विमानतळावर गेले. तिथून ते दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. अजित पवार गटाची दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीनंतर अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
- आजारातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारी :
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना डेंग्यूची लागण झालीय. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अजूनही ते पूर्णपणे बरे झाले नसल्याची माहिती आहे. पण तरीही ते आज दिल्लीला रवाना झाले आहेत. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. पण तेव्हासुद्धा अजित पवार सोबत गेले नव्हते. त्यानंतर आता अजित पवार एकटेच दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा