माजी सैनिकाला मारहाण प्रकरणी देशमुखांचे चौकशीचे आदेश !
मुंबई (वृत्तसंस्था)। निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याने भाजपने शिवसेनेने घेरलेले असतानाच आता राज्यातील आघाडी सरकारने भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.