अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
मुंबई, प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन आज मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.म्हणून आता आर्यन खान उद्या अर्थात 26 दिवसानंतर तुरुंगाबाहेर येणार आहे.
आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने अनेक प्रयत्न केले असून त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणी देखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढलच नसतं असही वकिलांनी कोर्टाला सांगितलं. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे अडकवल असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.
मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना आता जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे सिद्ध झालंय.