भाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, प्रतिनिधी: मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसााठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
“मराठी माणसाचं नाव घेऊन पक्षाचं दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. अतुल भातखळकर यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे. “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत”, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. “आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा… पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.