आपल्या हद्दीतील हॉटेलला पैसे द्यायची काय गरज? पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी…ऑडिओ क्लिप व्हायरल
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.
डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा-