मुंबईतून गुजराती, राजस्थानी गेल्यास ही आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त विधान
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यातून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्या म्हणत विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील स्थानिक चौकाला काल दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपालांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यातून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांचा राजीनामा घ्या अषी मागणी आता विरोधक करत आहेत. अनेक विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे.