खडसेचा राष्ट्रवादी प्रवेश; संभ्रम कायम ! जयंत पाटलांनी मोदी बद्दल केलेले ट्विट खडसेंनी रिट्विट करून केले डिलीट.
जळगाव (वृत्तसंस्था): भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेले एक ट्विट रिट्विट केले.
या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असे जयंत पाटलांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली होती. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रमुख नेते खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत, असे सांगत होते. मात्र, आता खडसे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेले ट्विट रिट्विट केल्यानंतर भाजपचे नेते कशाप्रकारे प्रतिक्रीया देणारे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ खडसेंच्या या रिट्विटवरुन साहजिकच प्रचंड चर्चा रंगली होती. यानंतर खडसे यांनी आपल्या अकाऊंटवरुन हे रिट्विट डिलीट करुन टाकले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
समर्थकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.